टिओडी मराठी, रत्नागिरी, दि. 22 जुलै 2021 – अतिमुसळधार पावसाचा तडाखा कोकणाला बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला महापूराचा सामना करावा लागतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडसह ज्या भागात खाड्या आहेत, त्या भागात पुराचा मोठा फटका बसलाय. चिपळूणमध्ये बसस्थानक पाण्याखाली गेलं आहे. एसटी बस अक्षरश: पाण्यात बुडाल्या आहेत. तर, चिपळूणनगरीत स्वागताची कमानही पाण्यात बुडाली आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो व व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषत: सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरला अतिमुसळधार पाऊस पडत आहे. खेडच्या जगबुडी नदीच्या पाण्यात मोठी वाढ झालीय. समुद्राजवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो. मात्र, खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते अन पुराचे पाणी काही तासातच ओसरते.
रात्री अतिमुसळधार पाऊस झाला. त्यात पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराने घेरले.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यामध्ये सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली.
चिपळूणमधील गावात पाणी शिरल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यात बसस्थानकातील एसटी बस पूर्णपणे पाण्यात बुडून गेल्या आहेत. त्यासोबत, शहरातील अनेक ठिकाणच्या चारचाकी वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यात.
महाबळेश्वर भागात अतिवृष्टी :
सातारा जिल्ह्यात विशेषत: महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टी झाली की, तेथील पाणी वाहून खेडमधील जगबुडी नदीला मिळते. बुधवारी रात्रीपासून महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जगबुडी नदी पातळीत वाढ झाली.
मागील काही वर्षात जगबुडी नदीने धोक्याची पातळी अनेकदा ओलांडली. मात्र, जुन्या पुलावरून पाणी जाण्याचा प्रकार खूपच कमी वेळा घडला होता. गुरुवारी या जुन्या पुलावरुन पाणी वाहत होते. अगोदरच मुसळधार पाऊस, त्यात भरती आणि त्यात महाबळेश्वरच्या पावसाची भर यामुळे खेड पाण्यामध्ये बुडाले.