टिओडी मराठी, ओटावा, दि. 1 जुलै 2021 – कॅनडा देशात अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे मागील शुक्रवारपासून तिथे १३० जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती वयस्कर आहेत. त्यातील काहीजण विविध व्याधींनी ग्रस्त होते. उष्णतेची लाट येण्यामागे ग्लोबल वॉर्मिंगसोबत इतरही कारणे आहेत, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
कॅनडामध्ये सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी तापमानामध्ये वाढ झाली आहे. लिटन या गावात मंगळवारी ४९.६ सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. कॅनडाचा पश्चिम भाग तसेच अमेरिकेच्या काही भागात उष्णतेची लाट आलीय.
रविवारच्या अगोदर कॅनडामध्ये ४५ सेल्सिअसच्या पुढे कधीही तापमान गेले नव्हते. व्हँकुव्हर शहरामध्ये शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेमुळे ६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅनडातील लिटन या गावातील रहिवासी मेगन फँडरिच यांनी सांगितले की, हवेत इतका उष्मा वाढला आहे की, त्यामुळे घराबाहेर जाऊन कोणतेही काम करणे अशक्य बनले आहे.
उन्हाळ्याच्या महिन्यांत कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात याअगोदर उष्ण तापमान एवढे वाढत नव्हते. त्यामुळे अनेक घरांमध्ये एसी बसविले गेलेले नाहीत. मात्र, मागील शुक्रवारपासून उष्णतेच्या लाटेत तापमान ४७ ते ४९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. त्यानंतर या रहिवाशांचे खूप हाल झालेत.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, अल्बेर्टा, सॅस्काचेवान, मॅनिटोबा या भागांत उष्णतेची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता वर्तविली आहे, असे तेथील पर्यावरण तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे या भागांतील जंगलात वणवेही लागू शकतील, असाही अंदाज वर्तविला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आता तेथील अग्निशमन दल सतर्क झालेले आहे.