शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Shivaji Park Dasara Melava) घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray Eknath Shinde) गटाकडूनही शिवाजी पार्क साठी मुंबई महापालिकेकडे अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना मैदान देता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर न्यायालयात या संदर्भात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. दसरा मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी, लोक येत असतात, असा युक्तिवाद उद्धव ठाकरेंकडून केला जाण्याची शक्यता आहे.
मात्र शिंदे गट देखील जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे दसरा मेळावा कुणाचा? यावर आता न्यायालयाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील नेस्को मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली होती. त्या सभेमध्ये देखील शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केला होता. या सर्व पार्श्वभुमीवर आज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.
गेली अनेक वर्ष शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या दसरा मेळाव्याला आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दरवर्षी शिवसैनिकांना संबोधित करायचे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे हे या दसरा मेळाव्याला संबोधित करायचे. मात्र, काही दिवसांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार, 12 खासदार, काही पक्ष पदाधिकारी गेले आणि त्यानंतर दसरा मेळावा कुणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला. कारण दोन्ही गटाकडून यासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते, यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.