मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे काल ब्रिच कँडी रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर काही वेळात अजितदादांनी घरी जाऊन काकीची विचारपूस केली. याविषयी खुद्द अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात माहिती दिली.
अजित पवार म्हणाले, काल काकींचं ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे. मला दुपारीच जायचं होतं ऑपरेशन झाल्या झाल्या, परंतु थोडा वेळ लागला. कारण खातेवाटप जाहीर झाल्याने मी मंत्रालयात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्यामुळे मला विधानसभा अध्यक्षांशीही बोलायचं होतं.
हेही वाचा” …“कूटनीती कुटून बारीक करायची असते;” उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर”
मी फोन केला, त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सांगितलं की दादा आम्ही आता सिल्व्हर ओकला निघालो आहोत, तर तू तिथेच ये. मला काकींना काहीही करुन भेटायचंच होतं, राजकारण आपल्या जागी, शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे, परिवाराला आपण महत्त्व देतो. पवार कुटुंबीयांची परंपरा आम्हाला आजी-आजोबांनी शिकवली आहे, नंतरच्या पिढीत आई-वडील, काका काकींनी शिकवली आहे. म्हणून अर्धा तास भेटायला गेलो.
मी काकींची विचारपूस केली, पुढचे २१ दिवस काळजी घ्यावी लागेल. माझ्या अंतर्मनाने सांगितलं, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून मी तिथे गेलो. पवार साहेब तिथे होते, सुप्रिया तिथे होती, काकी तिथे होत्या.