TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 7 मे 2021 – कोरोना साथीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोरेाना म्युटेशनची माहिती मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करावा, अशी विनंती त्यांनी पत्रातून केलीय. तसेच लसीकरणाबाबत आणि कोरोनाविरुद्ध लढण्यास केंद्र सरकारचे कोणतेही ठोस धोरण नाही, अशी टीका देखील राहुल गांधी यांनी पत्रातून केलीय.

देश पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या अपयशामुळे राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या स्थितीत उभा आहे. मागील वर्षीसारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामाना करायला लावू नका. यासाठी तत्काळ आर्थिक मदत पोहचवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पत्र पोस्ट केले आहे. त्यात म्हटले आहे, ‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कारण आपला देश कोरोना त्सुनामीत अडकला आहे. अशा अनपेक्षित संकटामध्ये भारतीय जनतेला आपले सर्वात अधिक प्राधान्य असायला हवे. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल, ते करण्याची मी तुम्हाला विनंती करतोय.

जगातील प्रत्येक सहा लोकांत एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता व गुंतागुंतीमुळे भारतामध्ये कोरोना विषाणूला आपलं स्वरूप बदलण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. परिणामी हा विषाणू जास्त धोकादायक होण्यास अनुकुलता आहे.

हे या साथीतून धडधडीतपणे समोर आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता करोनाची दुसरी लाट, त्यानंतर तिसरी लाट येईल. या कोरोना विषाणूची अनियंत्रितरित्या प्रसार होणे, हे केवळ देशासाठी नव्हे तर जगासाठी घातक ठरू शकते,’ असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हंटलं आहे.