राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला असून भाजप आणि शिंदे गटाचे १८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळात संधी मिळावी यासाठी नेत्यांकडून शेवटच्या क्षणांपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणातील उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रीपडची शपथ घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उदय सामंत यांचा मंत्रिमंडळात समावेश करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेला बळ देऊन कोकणात पकड मजबूत करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न आहे. (Uday Samant Took Oath As Cabinet Minister)
सामंत हे कोकणातील ज्येष्ठ आमदार आहेत. कोकणात रामदास कदम आणि त्यानंतर उदय सामंत यांनी ठाकरे यांना दिलेला धक्का ही मोठी घडामोड आहे. सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देत ठाकरे गटाला शह देण्याची ही मोठी खेळी मानले जाते.
उदय सामंत हे सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते. (Uday Samant was Guardian Minister of Sindhudurg in MVA Govt) रत्नागिरी जिल्ह्यातील पालकमंत्री अनिल परब यांच्या अनुपस्थितीत उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्यात दौरे करून हा जिल्हाही चांगला सांभाळला होता. त्यामुळे सामंत यांचा संपर्क या दोन्ही जिल्ह्यात ऊत्तम आहे. आठ वर्षांपूर्वी निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी दाखल केली होती. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ त्यांनी एकहाती आपल्याकडे ठेवला आहे. सामंत यांच्यासाठी हा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ आजही सेफ मानला जातो. उदय सामंत ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री होते. शिंदे फडणवीस सरकारमध्ये कोणती जबाबदारी दिली जाते याची उत्सुकता अनेकांना आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही सामंत यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे.
उदय सामंत यांच्याबरोबरच कोकणातून आमदार दीपक केसरकर व भाजपचे रवींद्र चव्हाण आणि मंगलप्रभात लोढा यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. रवींद्र चव्हाण यांनाही भाजपच्या गोटातून संधी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Deepak Kesarkar, Ravindra Chavhan, Mangalprabhat Lodha Took Oath as Cabinet Minister)