TOD Marathi

टिओडी मराठी, औरंगाबाद, दि. 2 जून 2021 – सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी औरंगाबादमधील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये जमलेल्या गर्दीचे कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला इम्तियाज जलील यांनी फटका मारला. त्यानंतर जलील यांच्यासह इतर 24 दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

एका दुकानावर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली होती. यावेळी खासदार इम्तियाज जलील हे दुकानाचे सील काढण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत कामगार उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये गेले. त्यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयातील जमलेल्या जमावाचे कर्तव्य म्हणून चित्रीकरण करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पाडण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या हातावर फटका मारला. महिला कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिलीय.

गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबादमधील अनेक दुकाने लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील केली आहेत. याशिवाय या दुकानांना दंडही ठोठावला आहे. परंतु छोट्या व्यापाऱ्यांना हा दंड व्यापाऱ्यांना भरणे शक्य नाही, त्यामुळे त्यांना आपली दुकाने सुरु करता येत नाहीत. यामुळे इम्तियाज जलील कामगार कार्यालयामध्ये गेले होते. याबाबत त्यांनी कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांना जाब विचारला.

महिला पोलीस कर्मचारी कार्यालयामध्ये जमलेल्या गर्दीचे चित्रीकरण करताना इम्तियाज जलील संतापले. आम्ही येथे मनोरंजनासाठी चित्रपट पाहायला आलो नाही, जमत नसेल तर बाहेर उभे राहा, अशा शब्दात जलील यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सुनावले. तसेच कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारला. त्यानंतर इम्तियाज जलील यांच्यासह इतर 24 दुकानदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.