TOD Marathi

पुणे :
आई आजारी असल्याचं कारण सांगत एका तरुणाने चार महिला आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मुकेश राठोड असे फसवणूक केलेल्या तरुणाचे नाव आहे. सध्या हा तरुण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या चार महिला आमदारांची फसवणूक झाली आहे. (Financial fraud with BJP MLA) मुकेशने आपली आई आजारी असल्याचे सांगत महिला आमदारांकडे मदत मागितली. दरम्यान आमदारांनीही मदत म्हणून त्याला ऑनलाईन माध्यमातून रक्कम दिली. मात्र नंतर तो कॉल फेक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आणि त्यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली.
आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांना फोन करून आईच्या मेडिकलकरीता पैशांची गरज असल्याचे सांगून तीन हजार चारशे रुपये पाठविण्यास सांगितले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान याप्रकरणी बोलताना आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale) म्हणाल्या, मलाही मदतीसाठी फोन आला होता. मात्र आपण कसलीही मदत केली नाही. संबंधित तरुणाची संपूर्ण शहानिशा करून घेतली होती. त्याने तो माझ्या मतदारसंघातला असल्याचे खोटे सांगितलं. त्यामुळे याबाबत माझी कसलीही आर्थिक फसवणूक झाली नाही. मात्र अशा लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.