TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 जून 2021 – मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र दिलं आहे.

आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत गायिका वैशाली माडे यांनी पक्षप्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश समन्वयक संतोष साखरे, सिनेअभिनेते आणि प्रदेश उपाध्यक्ष विजय पाटकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

वैशाली माडे यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशांनुसार राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहे.

गायिका वैशाली माडे यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात असे म्हंटले आहे कि, आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या पक्षाला तळागाळापर्यंत पोहचवून पक्षाची प्रतिमा आणि शक्ती वाढवायची आहे.

तसेच पक्षाची ध्येय-धोरणे व पक्षाचा स्वाभिमानी विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यात आणि त्यातून पक्षाचे संघटन मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आपण यशस्वी व्हाल, अशी अपेक्षा आहे. निवडीबद्दल आपले मन:पुर्वक अभिनंदन. आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा!!.