मुंबई | भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज ( ७ जुलै ) मोठी घोषणा केली आहे. त्या दोन महिन्यांसाठी सुट्टी घेणार आहेत, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पंकजा मुंडे यांच्याशी संवाद करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंकजा मुंडे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आहेत. दोन महिने सुट्टी घेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी बोललं आहे. आम्ही पंकजा मुंडे यांच्याशी संवाद करू. राष्ट्रवादीशी आमच्या पक्षातील काही जणांचा संघर्ष होता. त्यामुळे राष्ट्रवादी बरोबर आल्याने सर्वांना रूचेल, पटेल आणि आवडेल, असं आम्ही समजत नाही. या सर्व परिस्थितीतून संवाद साधत मार्ग काढू. पंकजा मुंडे राष्ट्रीय सचिव आहेत. वरिष्ठ नेते पंकजा मुंडेशी संवाद करतील,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा” …ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश”
वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंनी सांगितलं की, “मी आमदार झाल्यावर पहिल्या मुलाखतीत बोलले होते की, राजकारणात ज्या विचारसरणीला ठेवून मी आले. त्याच्याशी मला जेव्हा प्रतारण करावी लागेल, चुकीच्या तडजोडी कराव्या लागतील, तेव्हा राजकारणातून बाहेर पडायलाही मागेपुढे पाहणार नाही.”
“आत्ताच्या परिस्थितीत मला एका विश्रांतीची गरज आहे. एक-दोन महिने मी सुट्टी घेणार आहे. जनतेच्या बाबतीत काय घडतंय, यावर विचार करण्याचीही गरज आहे. अंतर्मुख होऊन मी जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.