TOD Marathi

अमरावती | भगवान शंकराच्या त्रिशुळाचा अपमान करू नका. त्याची तीन टोके कुठे बोचतील, हे तुम्हाला कळणारही नाही. याच त्रिशुळाने महिषासुराचा वध केला होता. तुम्हाला आता तीन तोंडे झाली आहेत. दहा तोंडे होतील, तेव्हा त्या रावणाचा वध करण्यासाठी आमचा एकच रामबाण पुरेसा असेल. हृदयात राम आणि हाताला काम, अशी आमची हिंदुत्वाची शिकवण आहे. तर, मुखी राम आणि बगलेत सुरी, असे भाजपचे बेगडी हिंदुत्व आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार हे विकासाचे त्रिशूळ असल्याचा दावा केला होता, त्यावर टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारला त्रिशूळ संबोधून त्याचा अपमान करू नये. आमचा एकच रामबाण हा सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा “…पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ घोषणेवर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…”

यावेळी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या नेत्यांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही भाजपसोबत गेलो, असे मिंधे सांगतात. आता तेच लोक राष्ट्रवादीच्या फुटीर नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.

आपल्याला निष्ठावान भाजपच्या नेत्यांची दया येते, हनुमान चालीसा जरूर म्हणा पण केवळ ढोंग करणाऱ्या उपऱ्या लोकांच्या ओझ्याखाली दबून जाऊ नका. याच ढोंगी लोकांच्या नादी लागून भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या आयुष्याची सतरंजी केली आहे, अशी टीका देखील ठाकरे यांनी राणा दाम्पत्यावर केली.