टिओडी मराठी, पुणे, दि. 28 जून 2021 – ओबीसींच्या आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय संन्यास घेईन असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांच्या घोषणेचा शेलक्या शब्दात समाचार घेतला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणं तुम्ही फार गांभीर्याने घेतले. ते म्हणाले होते स्वतंत्र विदर्भ होत नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही. मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडवू, असेही म्हणाले होते.
त्यानंतर आता ओबीसी आरक्षण मिळवून दिलं नाही, तर संन्यास घेईन म्हणतात. मात्र, यापैकी काही झालं नाही, असा टोला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
सत्तेसाठी काहीही बोलायचं, त्यानंतर कृती करायची नाही. हा भाजपचा पहिल्यापासूनचा प्रयत्न आहे. जनमाणसाला फसवणं व सत्ता मिळवणं हा उद्देश ठेवून ते अशी वक्तव्य करतात, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
ओबीसींच्या स्थगित करण्यात आलेल्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने 26 जून रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन केलं होतं. त्यावेळी राज्याची सूत्रे भाजपकडे सोपविली तर दोन ते तीन महिन्यांत ओबीसी आरक्षण परत मिळवून देतो. जर मी हे करू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईन, असं फडणवीस म्हणाले होते.