मुंबई: आपल्याकडे डिजिटल लोकेशनची यंत्रणा असती तर विनायक मेटे यांचा अपघात झाल्यानंतर पोलीस त्यांच्यापर्यंत योग्य वेळेत पोहोचू शकले असते. पण चालकाने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे गोंधळ झाला आणि पोलीस बराचवेळानंतर अपघातस्थळी पोहोचले. तोपर्यंत विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा मृत्यू झाला होता, अशी खंत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. ते विधानसभेत बोलत होते. (Devendra Fadnavis in Maharashtra Assembly Session)
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कालबाह्य यंत्रणेसंदर्भात भाष्य केले. विनायक मेटे यांच्या अपघाताच्यानिमित्ताने एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, आपल्याला आता सिस्टीम बदलाव्या लागतील. मेटे यांच्या ड्रायव्हरने ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर त्यांचं थेट लोकेशन जायला पाहिजे होते. चालकाने चुकीचा पत्ता सांगितला असला तरी मोबाईल टॉवरच्या माध्यमातून डिजिटल लोकेशन कळाले असते तर रायगड पोलीस वेळेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले असते. यासंदर्भात कुठे दिरंगाई किंवा चूक झाली का, याबाबत चौकशी झाली आहे. काही जणांवर कारवाईही झाली आहे. पण आपण गेलेल्या व्यक्तीला पुन्हा आणू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यानुसार आता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील डिजिटल लोकेशन पोलीस स्टेशनला अवगत झाले पाहिजे. (Mumbai Pune Expressway) जेणेकरून त्या त्या हद्दीतील पोलिसांना योग्यवेळी माहिती मिळेल. तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठे ट्रेलर्स, वाहने अनेकदा लेन सोडून चालवली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजन्ट ट्रॅफिक सिस्टीम (ITS) लावली जाणार आहे. जेणेकरून आपण सॅटेलाईट आणि ड्रोनच्या माध्यमातून या मार्गावर लक्ष ठेवू शकतो. ट्रॉलर लेन सोडून चालत असेल तर माहिती मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.