TOD Marathi

मुंबई: नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं गेल्या महिन्यात घेतला. या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केला आहे. एक सन्माननीय सदस्य, मंत्री आपल्याच भूमिकेच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतात का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील (NCP Leader Jayant Patil) यांनी उपस्थित केला. शिंदे आमच्यासोबत असताना एक बोलले आणि आता तिकडे जाताच त्यांचा सूर बदलला आहे, असं म्हणत पाटील यांनी शिंदेंची मिमिक्री केली. ती पाहून एकनाथ शिंदेही खळखळून हसले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री होते. (Eknath Shinde was Urban Development Minister in MVA Govt) त्यावेळी त्यांनी नगराध्यक्ष निवडीबद्दल वेगळी भूमिका घेतली होती. आता मात्र त्यांची भूमिका बदलली आहे, याकडे जयंत पाटलांनी लक्ष वेधलं. शिंदे आमच्यासोबत असताना एक बोलले. त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांचा प्रतिवाद करता आला नाही. आता तिकडे जाताच त्यांचा सूर बदलला. त्यांनी वेगळी भूमिका घेतली, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ ऑर्डरच्या (Point of Order) अंतर्गत एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. एक सभासद, एक मंत्री, एका टर्ममध्ये आपल्याच भाषणाच्या परस्परविरोधी भूमिका घेऊ शकतो का, असा सवाल पाटील यांनी विचारला. नगराध्यक्ष थेट जनतेमधून नको, याकरिता एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रस्ताव आणला. त्यावेळी ते आमच्या शेजारीच बसायचे. त्यावेळी त्यांच्यामध्ये इतका उत्साह असायचा. हे बंद केलं पाहिजे, ते चुकीचं आहे, असं ते म्हणायचे, असंही पाटील म्हणाले.

नगराध्यक्ष जनतेमधून थेट निवडला जावा असा निर्णय आता नव्या सरकारमध्ये आल्यावर त्यांनी घेतला. मात्र याच्या अगदी उलट भूमिका त्यांनी मागील सरकारमध्ये असताना घेतला होता. त्या प्रस्तावाची त्यांनी इतकी भारी वकिली केली होती की आम्ही सगळेच प्रभावित झालो. आम्ही त्यांचं म्हणणं मान्य केलं. त्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळानं मान्य केला. सभागृहातही शिंदेंनी उत्तम वकिली केली. त्याचा प्रतिवाद करणं फडणवीस यांनाही जमला नाही. मात्र आता शिंदेंनी साईड चेंज केली, याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं. यावेळी पाटलांनी शिंदेंसारखे हातवारे केले. त्यांची मिमिक्री केली. आपली मिमिक्री पाहून शिंदेंनाही हसू काही आवरता आलं नाही.