TOD Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची भेट घेतली. यापूर्वी गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) आणि ज्येष्ठ नेते लीलाधर डाके (Leeladhar Daake) यांचीही भेट घेतली आहे. एकंदरीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. रामदास कदम, आनंदराव अडसूळ अशा ज्येष्ठ नेत्यांनी यापूर्वीच शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि आनंदराव अडसूळ तर शिंदे गटातही सामील झाले आहेत. रामदास कदम यांनी तशी अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांचे पुत्र हे पहिल्या दिवसापासून शिंदे गटासोबत आहेत त्या अर्थाने रामदास कदम (Ramdas Kadam) हे देखील शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या प्लॅन मध्ये नक्की काय आहे हे जरी स्पष्ट कळत नसलं तरी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व नेत्यांशी संपर्क ठेवत आहेत, भेटीगाठी घेत आहेत.

या भेटीगाठी एकनाथ शिंदे यांना येत्या काळात मार्गदर्शक ठरू शकतात का? या सर्व नेत्यांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे काही वेगळा प्लॅन आहे का? की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर या सदिच्छा भेटी आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र एकनाथ शिंदे यांच्या या सर्व भेटींची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.