मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतं फुटल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)
याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघात परत निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं आहे. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, काल निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. शिंदे कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते गुजरातच्या सुरतमध्ये आहेत. (Shivsena in MLC Election 2022)
मात्र शिवसेना फोडण्याचा आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव आधीच शिजला होता, हे आता स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेनंतर या राजकीय डावपेचांमागे कोण आहे, हे समोर आलं आहे.
विधानपरिषदेचं मतदान पार पडताच शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला सुरक्षित स्थळी पोहोचणार असल्याचं आधीच ठरलं होतं. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी यंदा राजकीय खेळी केली आहे. याला फडणवीस आणि अमित शाहांचं पाठबळ मिळालं. सी. आर. पाटील यांनी याआधीही गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. यावेळीच हा कट शिजल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मतदान झाल्यानंतर सुरतला रवाना व्हायचं, हे एकनाथ शिंदेंनी पूर्वनियोजित केलं होतं अशी माहिती देखील आहे.
तर शिवसेनेत महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद निर्माण होणार नाही, महाराष्ट्रात मध्यप्रदेश आणि राजस्थान पैटर्न चालणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.