शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील मविआ सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चर्चा करण्यास तयार आहोत, (We are ready to talk with CM Uddhav Thackeray) असं बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय घ्यावा, असंही केसरकर यांनी सांगितलं आहे. (Says Deepak Kesarkar)
‘उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत चर्चा केली पाहिजे, ते कुठे दुखावले गेले असतील तर त्याची कारणेही जाणून घेतली पाहिजेत आणि भाजपनेही त्याचा विचार केला पाहिजे. भाजप आणि शिवसेना हे अनेक वर्षांचे मित्र आहेत. त्यांनी एकत्र कसं यावं, हे सांगण्याएवढा मी मोठा नाही. भाजप आणि शिवसेनेनं चर्चा करावी. या चर्चेतून काही सकारात्मक निघालं आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं तर तेही उद्धव ठाकरे यांना भेटायला जातील. मुख्यमंत्र्यांना दुखवावं असं शिंदे यांच्या मनात नाही. फक्त शिवसेनेनं कोणाशी आघाडी आणि युती करावी, एवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित आहे,’ अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.