मुंबई : महानगरपालिकेच्या निवडणूकीची रंगता समजली जाणारी आणि शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरची अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक ( Andheri East Election ) पार पडतेय. बऱ्याच राजकीय नाट्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके तर भाजपकडून मुरजी पटेल ( BJP Candidate Murji Patel ) निवडणूकीच्या मैदानात उतरलेत. मात्र आता मनसेेनं यात उडी घेेत भाजपनं आपला उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी करणारं पत्र उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांना लिहीलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरेंच्या याच विनंती पत्रावर आता फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तसेच, त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलारांकडे केली.
भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तर त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं.
पण या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल, असं स्पष्टीकरण फडणवीसांनी बोलताना दिलं.