नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधी पुन्हा एकदा आंदोलन तीव्र करणार असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकरी नेत्यांनी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधून मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी दिल्लीच्या सीमारेषेवर हजर राहण्यासाठी आवाहन केलं आहे.
सुप्रीम कोर्टाने गुरुवारी म्हणजेच उद्या आंदोलनाच्या अधिकारासंबंधी तसंच प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा हक्क आहे का? यासंबंधी तपासून पाहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्या आधीच शेतकरी नेत्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने जमा होण्याचे आवाहन केले आहे.
न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही (शेतकरी) संपूर्ण शहराला घेरल्यामुळे आधीच श्वास कोंडला आहे, आता तुम्हाला शहरांमध्ये येऊन कशासाठी आंदोलन करायचे आहे, तुम्हाला न्यायालयाविरोधात आंदोलन करायचे आहे का, अशी सरबत्ती करत सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनावर ताशेरे ओढले होते.