टिओडी मराठी, पुणे, दि. 3 मे 2021 – अहमदपुर-चाकूर या दोन्ही तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिरूर ताजबंद येथील मोहनराव पाटील आयुर्वेद रुग्णालयामध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे आज (दि. 3 मे 2021) लोकार्पण केले. सर्व पायाभूत भौतिक सुविधा आणि आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधांयुक्त इमारतीमध्ये 100 बेडचे अद्ययावत असे हे रुग्णालय आहे.
या कोविड सेंटरमध्ये एकूण 100 बेड असून त्यात 50 बेड हे ऑक्सिजनयुक्त तर 50 बेड हे आयसोलेशन करिता उपलब्ध केलेले आहेत. या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा ग्रामीण भागातील कोरोनाग्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. नैसर्गिक आपत्ती आणि त्यासोबतच हलाखीची परिस्थिती यामुळे गरीब कुटुंबाला कोरोना या महामारीच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट दूर करता यावे, या बाबी लक्षात घेऊन हे सेंटर सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न केला, असे अहमदपूर-चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं आहे.
याठिकाणी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीर येथील काही तज्ञ डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ निस्वार्थपणे कोवीड रुग्णांवर उपचार करणार आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, जि.प.चे गटनेते मंचकराव पाटील, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, गटविकास अधिकारी अंदेलवाड, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मिनाक्षी शिंगडे, ग्रामीण रुग्णालय अहमदपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिरादार, सिध्दी शुगरचे संचालक सुरज पाटील, धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल, उदगीरचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय पाटील, सरपंच सावित्री पडोळे, प. स. सदस्या सुशीला भातीकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल दासरे, डॉ. अमृत चिवडे, डॉ. राम यलगटे, डॉ. नरेंद्र हाके, डॉ. वैभव बिरादार, डॉ. गुरुराज वर्नाळे, तलाठी शाम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.