बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) चक्रीवादळाची (Cyclone) स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणात सतत बदल (Climate Change) होत आहे. या परिस्थितीमुळे तामिळनाडू (Tamilnadu) आणि पुद्दुचेरी (Puducherry) या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तमिळनाडू मधील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अनेक शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या या स्थिती मुळे महाराष्ट्रात देखील याचा परिणाम दिसून येत आहे. या चक्रीवादळाला ‘ मंदोस ‘ हे नाव देण्यात आले आहे.महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी झाला असून काही ठिकाणी वातावरण ढगाळ झाले आहे.
तमिळनाडू मधील १३ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून तसेच अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे वादळ पश्चिम वायव्य दिशेने सरकत आहे. यांनतर ते अंदाजे १० डिसेंबर पर्यंत आंध्रप्रदेशच्या दक्षिण किनाऱ्यावर येऊन पोहचण्याची शक्यता आहे. या वादळाचा वेग ६५ किमी ते ८५ किमी प्रतीतास असा असण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
वादळाचा महाराष्ट्रावर विशेष परिणाम नाही
बंगलाच्या उपसागरात तयार होणारं चक्रीवादळ नैसर्गिक प्रक्रियेसारखे पूर्व पश्चिम अंदाजे १५ डिग्री अक्षवृत्त दरम्यान अग्नेयेकडून वायव्य दिशेकडे जात आहे. त्यामुळे त्याचा फारसा परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. या बाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या आठवडाभर म्हणजेच ९ ते १६ डिसेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यामुळे थंडीचा जोर कमी होऊन तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊसाची शक्यता असण्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.