टिओडी मराठी, दि. 25 मे 2021 – मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशांनी यान सोडलं आहे. त्यातील रोव्हरसारख्या यंत्रांद्वारे अभ्यास केला जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने देखील आपल्या अंतराळ मोहिमांना वेग दिलाय. त्यातून नवीन रहस्यांचा उलगडा करण्याचा निर्धार नासाने केलाय.
नुकतेच नासाने 270 किलोमीटर उंचीवरून क्युरियोसिटी रोव्हरचे छायाचित्र काढले आहे. मंगळावरच्या डोंगरावर चढाई करणाऱया रोव्हरचा व्हिडियो देखील थक्क करणारा आहे.
क्युरियोसिटी रोव्हर मंगळावर 2014 पासून माऊंट शार्पवर चढाई करतोय. मार्चच्या सुरुवातीच्या काळामध्ये क्युरियोसिटीने माँट माकावर चढाई सुरू केलीय. या मोहिमेमध्ये या रोव्हरने मंगळावर जीवसृष्टीच्या दृष्टीने काही पुरावे दिलेत.
येत्या काही वर्षांत मंगळ ग्रहावरील आणखी काही रहस्यांचा उलगडा होणार आहे, असे संकेत नासकडून मिळत आहेत. क्युरियोसिटी मंगळाच्या भूतकाळाविषयी अधिक रहस्यांचा उलगडा करू शकेल, अशी शक्यता देखील संशोधकांनी व्यक्त केलीय.
क्युरियोसिटी रोव्हर शोधतोय ग्रहावरील ‘मिठ’ :
मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर क्युरियोसिटी रोव्हर मीठ शोधण्याच्या अगदी जवळ पोहोचलाय. रोव्हरद्वारे टिपलेली छायाचित्रे आणि डेटाचा सखोल अभ्यास करून मंगळावर जीवन होते की नाही? हे समजेल. मंगळावर सेंद्रीय व कार्बनयुक्त मीठ अस्तित्वात आहे, असे आतापर्यंतच्या अभ्यासातून निदर्शनास आले आहे.