टिओडी मराठी, लातूर, दि. 26 जून 2021 – देशात कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेले नाही. या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, येणारी तिसरी लाट देखील हि दुसऱ्या लाटेसारखी भयानक नसेल, असा अंदाज ‘आयसीएमआर’ने एका अहवालद्वारे प्रसिद्ध केला आहे.
त्यामुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे देशात काही रुग्णही आढळले असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. यातील एक मृत्यू महाराष्ट्रातील आहे.
‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)’ने कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेसारखी भयानक नसेल, असा अहवाल प्रसिद्ध केलाय. कोरोना प्रतिबंधक लसीकरणात आणखी तेजी आणल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर अंकुश लावता येईल, असे आयसीएमआरने आपल्या अहवालात म्हटले आहे.
‘आयसीएमआर’चे डॉ. संदीप मंडल, डायरेक्टर जनरल बलराम भार्गव, चिफ एपिडेमोलॉजिस्ट डॉ. समीरन पांडा आणि निमालन अरिनमिनपथी यांनी एका गणितीय मॉडेलच्या आधारावर हा अहवाल सादर केलाय.
या अहवालानुसार, कोरोनाची लागण होऊन जे लोक कोरोनामुक्त झालेत त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वेळेनुसार कमी होऊ शकते. त्यामुळे ज्यांना अगोदर कोरोनाची लागण झाली होती तेच लोक पुन्हा एकदा कोरोना सक्रमित होऊ शकतील.