TOD Marathi

टिओडी मराठी,मुंबई, दि. 16 मे 2021 -कोरोना रोखण्यासाठी लसीकरण करणं सरकारला आवश्यक आहे. पण, किती आणि कश्या लस दिल्या आहेत? कोणाला लस दिली आहे? यासाठी माहिती व्हावी म्हणून आधार कार्ड दाखवून कोरोना लस घेतली/दिली जात आहे. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसपासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे, असे युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया अर्थात यूआयडीएआयने स्पष्ट केलं आहे.

कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणे, या गोष्टी आता बंद होणार आहेत. या कारणांसाठीही आता आधार बंधनकारक राहणार नाही, असे UIDAI ने स्पष्ट केलं आहे.

देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना UIDAI चा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय. या अगोदर अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवले जात होते. कोरोना रुग्णाना रुग्णालयात दाखल करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार व औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता UIDAI च्या स्पष्टीकरणामुळे यावर पडदा पडला आहे.

कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणे बंधनकारक केले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही, त्यांना लस मिळणार नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच मागील चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार किंवा UIDAI कडून आले नव्हते. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरी ही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झालं आहे.

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हते. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना दाखल करुन घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नाही, याचा अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.