टिओडी मराठी, दि. 21 जुलै 2021 – अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे अमेरिकन नागरिकांना आता भारतात प्रवास करता येणार आहे. कारण, प्रवास करण्याबाबत असलेले निर्बंध अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याने कमी केलेत. अमेरिकेने निर्बंध शिथिल करताना भारताला लेव्हल-४ वरून लेव्हल-३ वर आणलं आहे. लेव्हल-३ चा अर्थ ‘प्रवासाचा फेरविचार करा’ असा होतोय.
अमेरिकेच्या विदेश विभागाने निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, आमच्या ‘साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रा’ने (सीडीसी) भारतातील प्रवासासाठी लेव्हल-३ ची सूचना जारी केलीय. याचा अर्थ देशात कोविड-१९ चा प्रादुर्भाव आहे, असा होतोय.
कोणताही विदेशी प्रवास करण्यापूर्वी एफडीएने मान्यता दिलेली कोविड-१९ प्रतिबंधक लस घ्यावी. लसीमुळे संसर्गाचा धोका कमी होतोय. त्याचप्रमाणे सीडीसीच्या शिफारशी आवश्यक जाणून घ्याव्यात. अमेरिकेने पाकिस्तानातील प्रवासासाठीची सूचना लेव्हल-४ वरून लेव्हल-३ वर आणलीय.
भारतीय विमानांना असलेल्या प्रवेशबंदीत कॅनडाने २१ ऑगस्ट २०२१ पर्यंत वाढ केलीय. त्याचप्रमाणे संयुक्त अरब अमिराती (यूएई) ने ही भारतीय विमानांवरील बंदीमध्ये वाढ केलीय. याअगोदर कॅनडा सरकारने भारताची विमाने २१ जुलैपर्यंत निलंबित केली होती.
भारतीय प्रवासी अप्रत्यक्ष मार्गाने मात्र कॅनडामध्ये प्रवेश करू शकतात. भारतातील कोरोना चाचणी अहवाल स्वीकारण्याचे कॅनडाने नाकारले आहे. त्यामुळे भारतातून कॅनडामध्ये येणाऱ्या प्रवाशांना तिसऱ्या देशात कोरोना टेस्ट करून घ्यावी लागणार आहे.