टिओडी मराठी, मुंबई, 31 ऑगस्ट 2021 – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा कोरोना भत्ता मिळाला नाही. त्यासह सानुग्रह अनुदान (बोनस) तसेच आहार आणि जोखीम भत्ता मिळाला नाही. कोरोना काळातही जिवाची बाजी लावून क्षयरोग निर्मूलनासाठी कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना कोरोना, जोखीम भत्ता तसेच सानुग्रह अनुदान द्यावे, अन्यथा, बेमुदत आंदोलन करू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका प्रशासनाला दिलाय.
जगात कोरोनाचा कहर सुरू आहे. मुंबईतही कोरोना काळात मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येत असलेले मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेतील सुमारे 3 हजार 500 कर्मचारी जिवाची पर्वा न करता तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. कोरोना काळातही आपले कर्तव्य बजाविणाऱ्या या कर्मचाऱ्यांना दरदिवशी 300 रुपये कोरोना भत्ता देण्याचे महापालिकेने मान्य केलं होतं. मात्र, 8 महिने होऊन गेले तरी ऑगस्ट ते डिसेंबर 2020 या पाच महिन्यांचा कोरोना भत्ता या क्षयरोग कर्मचाऱयांना मिळालेला नाही. मुंबई क्षयरोग अधिकारी (सीटीओ) कार्यालयामध्ये याबाबत विचारणा केली असता फंड उपलब्ध नाही, असे सांगितले जात आहे.
सानुग्रह अनुदान (बोनस), प्रलंबित आहार आणि जोखीम भत्ता लवकर द्यावा. त्यासह मासिक अहवाल सादर करण्याची जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे वार्षिक अहवाल सादर करण्याची परवानगी मिळावी. सेवाज्येष्ठ कर्मचारी व नवे कर्मचारी यांच्या वेतनातील तफावत दूर करावी, नाहीतर बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी दिलाय. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन कदम यांनी आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांना दिले आहे.