मुंबई : राज्यातील प्रमुख नेते अयोध्या दौऱ्याचे नियोजन करत असताना आता त्यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. यापुर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याबद्दलच्या चर्चा सुरू आहेत. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील अयोध्येला जाणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत तर त्यानंतर बरोबर 5 दिवसांनी म्हणजेच 10 जून रोजी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी टिळक भवन दादर येथे नाना पटोले यांची भेट घेत त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. त्या निमंत्रणाचा स्वीकार केला अशा प्रकारची माहिती नाना पटोले यांनी सोशल मीडिया वरून दिली आहे. त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील अयोध्याला जाणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील गेल्या आठवड्यात कुटुंबासमवेत अयोध्या दौरा करून आलेले आहेत.
सर्वच पक्षाचे प्रमुख नेते अयोध्या दौरा करणार असं चित्र दिसतंय. राजकीय नेत्यांमध्ये अयोध्या दौरा आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याचे दिसून येत आहे.