TOD Marathi

राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्त्वात आज कॉंग्रेस (Congress) मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरची जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन काँग्रेसचं आंदोलन आहे. 7 सप्टेंबरपासून कॉंग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू होत आहे. त्या आधी महागाई ते बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपविरोधात काँग्रेस रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहे. रामलीला मैदानावर आज होणाऱ्या या रॅलीत काँग्रेसनं मोठ्या संख्येनं लोक जमल्याचा दावा केला आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी देशभरातून काँग्रेस कार्यकर्तेही पोहोचत आहेत.

काँग्रेसच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रॅलीपूर्वी पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेस मुख्यालयात जमणार आहेत. येथे हे सर्वजण बसमध्ये बसून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. या रॅलीची तयारी पक्षानं पूर्ण केली असतानाच पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे.

भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरपासून

काँग्रेसची 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी 3,500 किमी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु होण्यापूर्वी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान, खासदार राहुल गांधी महागाई आणि बेरोजगारी या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी आणि जातीय सलोखा वाढवण्यासाठी देशभर प्रवास करणार आहेत. ‘भारत जोडो यात्रा’ ही काँग्रेस पक्षाची आतापर्यंतची सर्वात मोठी जनसंपर्क यात्रा आहे. ज्यामध्ये पक्षाच्या नेत्यांसह तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपचारासाठी देशाबाहेर गेल्या असून प्रियांका गांधीही त्यांच्यासोबत परदेशात आहेत. त्यामुळे त्या दोन्ही कार्यक्रमांत सहभागी होणार नाहीत.