मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करावी आणि नगरपालिका निवडणुकांना (Nagar Palika Election) स्थगिती द्यावी, अशी मागणी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde PC in Mumbai) यांनी केली आहे. ओबीसी आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. आरक्षणाविना येत्या निवडणुका झाल्या, तर त्या अन्यायकारक ठरतील, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली. मुंबईत पत्रकार परिषदेत पंकजा बोलत होत्या.
१८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचा निर्णय १८ जुलैला सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत होणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे. (Supreme Court on OBC reservation)
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
संपूर्ण ओबीसी समाजाचं सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष होतं. जाहीर झालेल्या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहेत, मात्र मला सरकारकडून अपेक्षा आहेत. ओबीसी प्रश्नावर लढणारी एक कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना माझी विनंती आहे, की त्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा करुन तात्काळ आगामी निवडणुकांना स्थगिती द्यावी, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली. (Pankaja Munde demands CM and DCM)
९२ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत. (Local body election in Maharashtra) या निवडणुका झाल्यानंतर जर उर्वरित ठिकाणी आरक्षण लागू झालं, तर तो समान न्याय नसेल. या निवडणुकांनाही राजकीय आरक्षण मिळणं हा लोकांचा हक्क आहे. मागच्या वेळीही माझी हीच मागणी होती, त्यात कुठलीही तडजोड नाही, असंही पंकजांनी स्पष्ट केलं.
केवळ ओबीसी आरक्षणामुळेच नाही, तर अतिवृष्टी, महापूर, यासारख्या अनेक कारणांमुळे निवडणुकांना स्थगिती देता येईल. पण ओबीसी आरक्षण हेही तितकंच गंभीर कारण आहे. ओबीसी आरक्षण देण्याची सरकारची मानसिकता आहे. नोटिफिकेशन काढल्यावर निवडणुका कशा थांबवायच्या हा कोर्टाचा प्रश्न योग्य आहे, मात्र सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. सत्तेत असताना-नसताना भूमिका बदलणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मान्य नाही, असंही पंकजा मुंडे यांनी ठणकावून सांगितलं.