‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवाद नको आहे, मीही वंशवादाचे प्रतीक आहे. मात्र, मी जर तुमच्या मनात असेल तर पंतप्रधान मोदीही मला संपवू शकत नाही’ (Pankaja Munde statement on PM Narendra Modi) असं मोठं वक्तव्य भाजप नेत्या आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (BJP Leader Pankaja Munde) यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेलं हे विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं, त्यानंतर भाजप नेत्यांकडून मात्र पंकजा मुंडेंची पाठराखण करण्यात आली.
मोदी मला संपवू शकत नाहीत, असा पंकजा मुंडे यांच्या म्हणण्याचा अर्थ नव्हता. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी जर जनतेच्या हृदयाचे प्रतीक असेल तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची पाठराखण करताना दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे पक्षात नाराज आहेत का? अशा चर्चा होत्या त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचे हे विधान महत्त्वाचं मानलं जात होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देखील या संदर्भात खुलासा केला आणि आपलं विधान हे नकारात्मक नव्हतं, अशी प्रतिक्रिया दिली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (NCP Leader Eknath Khadse) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष तळागळात पोहोचवण्यासाठी दिवस-रात्र एक करून मेहनत केली. तेव्हा पंकजा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.