टिओडी मराठी, दि. 20 जुलै 2021 – छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा भाजपचा तत्कालीन उपमहापौर शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांच्या विरोधामध्ये गृह विभागाच्या परवानगीनंतर न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केले आहे.
तपासी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. सुमारे 60 पानांचे हे दोषारोपपत्र आहे. धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक तेढ निर्माण करण्यासह सामाजिक एकोपा धोक्यात येईल, अशी वर्तणूक केल्याचा आरोप छिंदम याच्यावर ठेवला आहे.
भाजपचा उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने 2018 साली महापालिकेतील कर्मचारी बिडवे याला फोन करून शिवीगाळ केली होती. यावेळी श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द वापरले होते. त्याच्या या वक्तव्यामुळे जिह्यासह राज्यामध्ये संतप्त पडसाद उमटले होते.
श्रीपाद छिंदम याच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल :
शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्या विरोधामध्ये आज दोषारोपपत्र दाखल झालं आहे. त्यात मागील आठवड्यात एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडलाय. यासंदर्भामध्ये श्रीपाद छिंदम याच्यासह 5 जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.