टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 14 ऑगस्ट 2021 – देशातील सर्वात मोठी मीडिया ब्रॉडकास्टर्स संस्था असलेल्या न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने (एनबीए) आपले नाव बदलले आहे. ते आता न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशन (एनबीडीए) असे असणार आहे. त्यामुळे आता डिजिटल बातम्या प्रसारित करणारी माध्यमं म्हणजे डिजिटल मीडिया न्यूज ब्रॉडकास्टर्सही या संस्थेच्या कार्यकक्षेमध्ये येणार आहेत. न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने ही घोषणा केलीय.
न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी सांगितलं की, एनबीएने आता आपल्या कार्यकक्षेत डिजिटल मीडिया न्यूज ब्रॉडकास्टर्सना आणण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे एनबीए बोर्डने आपल्या नावात बदल केला आहे. ते आता एनबीडीए या नावाने ओळखलं जाणार आहे.
पुढे रजत शर्मा म्हणाले, येत्या काळामध्ये एनबीडीए ही संस्था ब्रॉडकास्टर्स व डिजिटल मीडिया या दोघांचाही एक बुलंद आवाज म्हणून अधिक भक्कमपणे काम करेल, असा मला विश्वास आहे. व्यावसायिक आणि इतर नियमित स्वरुपाच्या कामासोबतच ही संस्था राज्यघटनेने प्रदान केलेल्या माध्यमांच्या मूलभूत अधिकारांचे व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करेल.
न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन ही देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांची एक स्वतंत्र्य स्व- नियामक संस्था आहे. या संस्थेच्या अंतर्गत देशातील ८० टक्के न्यूज व्ह्यूवर्स कव्हर होत असतात. सध्या माध्यमांमधील बदलत्या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांना व्यापक पर्याय निर्माण झालेत.
डिजिटल मीडिया हे माध्यमांची पुढची क्रांती आहे. त्याला मोठं भविष्य आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या डिजिटल मीडियाला या संस्थेच्या कार्यकक्षेत आणण्यासाठी न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने आपले नाव बदलले आहे. ते न्यूज ब्रॉडकास्टर्स डिजिटल असोसिएशन असे केलं आहे.