टिओडी मराठी, मुंबई, दि. 30 जून 2021 – भाजप कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. याप्रकरणी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहिलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पत्र लिहून निवेदन सादर केलंय.
या दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सचिन वाझे या निलंबित पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात अजित पवार आणि अनिल परब यांचं नाव असल्याने त्यांची सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे, असं मत भाजपने व्यक्त केलं होत. त्यानंतर महाराष्ट्रातील या दोन मोठ्या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना केलीय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून अनेक बाबीं उघड केल्याने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला.
याप्रकरणी अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा हि द्यावा लागला होता. या प्रकरणात अजित पवार आणि अनिल परब या दोघांचेही नाव आहे, त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजपतर्फे होत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची दखल अमित शहा घेणार का?. त्यावर नेमके काय पावले उचलणार? हे महत्त्वाचं ठरणार आहे.
याप्रकरणी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येणार, असे चित्र आहे. तसेच अजित पवार आणि अनिल परब हे यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.