TOD Marathi

राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन राजकारण सुरु आहे. कोणाचा दसरा मेळावा (Dasara Melava) मोठा होणार, किती गर्दी होणार ही चर्चा सुरु आहे. मात्र या सगळ्या धामधुमीदरम्यान एक मोठी बातमी आहे.

शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात होणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभेसाठी पहिली पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

अंधेरी पूर्व विधानसभेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणुकीत चिन्हाचं काय होणार याबाबतही सस्पेन्स वाढला आहे.

शिवसेनेत धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह कुणाकडे जाणार याबाबत अजूनही कुठलीही स्पष्टता नाही. याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग देणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेत उभे राहणाऱ्या उमेदवाराला विशेषतः शिवसेनेच्या उमेदवाराला धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कारण उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वतीने आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वतीने दोन उमेदवार जर शिवसेनेचेच उमेदवार म्हणून या रिंगणात उभे होऊ ठाकले तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला द्यायचे, असा प्रश्न निर्माण होणार आहे. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे पोटनिवडणूक असली तरी ती खूप महत्त्वाची आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून विशेषतः शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येतात हे बघावे लागेल.