सातारा | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा पेटला असून हे दोन्ही नेते आज आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. साताऱ्यातील खिंडवाडी येथे शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते. मात्र या भूमिपूजनाआधीच खासदार उदयनराजे हे आपले कार्यकर्ते आणि काही ग्रामस्थांसह तिथे आले आणि त्यांनी पोकलेन मशीनच्या मदतीने उद्घाटनाच्या साहित्याची तोडफोड केली. त्यानंतर शिवेंद्रराजेही ठरलेल्या वेळेत भूमिपूजनासाठी आल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
उदयनराजेंकडून भूमिपूजनाच्या ठिकाणी असलेल्या साहित्याची तोडफोड करण्यात आल्यानंतर तिथे दाखल झालेल्या शिवेंद्रराजेंनी पोलिसांना आपली भूमिका सांगितली आणि नंतर नियोजित पद्धतीने भूमिपूजनही केले.
सातारा बाजार समितीत आमदार शिवेंद्रराजे यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आल्यानंतर निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी खिंडवाडी येथे साडेपंधरा एकरवर नवीन बाजार समितीची इमारत उभी करण्यात येत आहे. या इमारतीचा भूमिपूजन समारंभ आज सकाळी शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होता. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारीही करण्यात आली होती. मात्र अशातच स्थानिक नागरिकांसह उदयनराजे भोसले स्वतः दाखल झाले आणि आक्रमक भूमिका घेत तिथे असणाऱ्या साहित्याची मशीनच्या साहाय्याने मोडतोड सुरू केली.
साहित्याची मोडतोड सुरू झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उदयनराजे पोलिसांनी म्हणाले की, ‘सदरील जागा माझी असून मालक मी आहे. त्यामुळे माझे शेड मी तोडल्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझ्या जागेत शेड म्हणजे ते माझेच आहे. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे,’ असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.