TOD Marathi

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी BJP चे ‘या’ मुद्द्यावर विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रतिअधिवेशन; सरकारचा नोंदवला निषेध

टिओडी मराठी, मुंबई, दि. 6 जुलै 2021 – विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गोंधळ, गदारोळ, धक्काबुक्की, धमकी आदी बाबीमुळे तालिका अध्यक्षांनी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. याचा निषेध म्हणून आज विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर प्रतिअधिवेशन घेतलं आहे. आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा दुसऱ्या आणि अंतिम दिवस आहे, त्यामुळे या दिवशी काय होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपने विधान भवनाच्या पाऱ्यांवर प्रती सभागृह भरवून सरकारचा निषेध नोंदवला आहे. तसेच हे सरकार लोकशाही मार्गाने जात नाही. विधान भवनाच्या पाऱ्यांवर बसून भाजप आमदारांकडून घोषणाबाजी केली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाअगोदरच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहिले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी देखील मौन बाळगलं. आता दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री बोलणार का? याकडेही लक्ष लागलं आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय घडलं?
केंद्र सरकारने राज्याला मागासवर्गाची माहिती त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशी शिफारस करणारा ठराव राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळात मांडला.

याला विरोध करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, “हा प्रस्ताव आला तर विरोधी पक्ष त्याला पाठिंबा देईल. पण, यातून काही साध्य होणार नाही. हा राजकीय प्रस्ताव आहे.” तर, ओबीसी आरक्षणाचा ठराव हा आरक्षण देण्यासंदर्भात करावा. पण, हा ठराव जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी केला आहे, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडला. असं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं आहे.मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. संजय कुटे, आशिष शेलार, जयकुमार रावल, गिरीश महाजन अभिमन्यू पवार, हरिष पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, पराग अळवणी, नारायणे कुचे, बंटी भांगडीया, योगेश सागर या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. एका वर्षासाठी त्यांना निलंबित केलं आहे.

त्यानंतर या 12 आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजप आमदारांच्या निलंबनाचं षडयंत्र रचलं आहे. राज्यपालांनी घडलेल्या घटनाचा अहवाल मागवावा, अशी मागणी केल्याचे भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं. ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची हत्या करून प्रेतयात्रा काढली, असंही ते म्हणाले.

मंत्री महोदयांनी दाखवलेला व्हीडिओ पाहिला तर लक्षात येतं की, आमच्यापैकी कोणीही अपशब्दांचा वापर केलेला नाही. आम्ही या कारवाईचा निषेध करतो, असा दावासुद्धा त्यांनी यावेळी केला.