TOD Marathi

मुंबई: महाराष्ट्रातील राज्यसभा पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. कारण भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनाने होत असलेल्या पोटनिवणुकीतून, आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

या विनंतीला मान देत आणि राज्याची परंपरा कायम रहावी, यासाठी भाजपाचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. तर, रजनी पाटील यांनी खासदारकी बिनविरोध पक्की झाल्यानंतर भाजपचे आभार मानले आहेत.

मला आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, असं म्हणत रजनी पाटील यांनी सातव यांचा आवर्जून उल्लेख केला. तसेच, सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला, दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन ही मला संधी मिळाली. भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला त्यांचे आभार मानते, असं देखील रजनी पाटील यांनी म्हटलं.