टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. मात्र, त्याअगोदर महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ‘साखर कारखान्यांच्या चौकशीची मागणी करून भाजपचे नेते नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचा डाव साधत आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.
विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलत असताना नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी सुधारीत कृषी विधेयक आणले जाणार आहे, अशी देखील माहिती मलिक यांनी दिली.
‘कुणी काय तक्रार करत आहे? हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आरोप करत असताना यापूर्वी पण किरीट सोम्यांनी आरोप केलेत. आता चंद्रकांत पाटील हे सुद्धा गडकरींवर आरोप करत आहेत. त्यामुळे गडकरी यांना अडचणीत आणण्याचे काम भाजप करत आहेत, असे दिसून येत आहे, असे देखील नवाब मलिक म्हणाले.
दुसऱ्यांदा जेव्हा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले जाणार होते. त्यावेळी सुद्धा गडकरी यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे गडकरींना अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले. आता पुन्हा एकदा नितीन गडकरींवर आरोप केले जात आहेत, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत दिसून येत आहे, असे मलिक म्हणाले आहेत.
‘मन मिळाली नाही तरी चालले पण हातातून हात मिळाले पाहिजेत. राजकारणात कटूता आणि शत्रूता कायम नसते. जर मनभेद असतील तर बोलून त्यावर मार्ग काढला पाहिजे. जर मनातलं बोलून नाते सुधारत असतील तर ही चांगली बाब आहे, असे म्हणत मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
‘धर्म यावर राजकारण आम्ही मानत नाही. भागवतांचे मत परिवर्तन होत असेल तर चांगले आहे. केवळ विधानांत बदल नको, तर कृती हवी. मुह में राम बगल छुरी, असेही नको’, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर दिलीय.
देशात तीन कृषी कायदे केलेत. आजही या कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. सुप्रीम कोर्टानेही या कायद्यांना स्थगिती दिलीय. इसेन्शिअल कमोडिटी ऍक्टनुसार किती साठा ठेवायचा? त्याला लिमिट राहणार नाही. पण, मागच्या शुक्रवारी स्टॉक लिमिटबाबत अध्यादेश काढला आहे, त्यामुळे हे कायदे मान्य नसताना केंद्राने कायदे रद्द करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.