TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 5 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारला. या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एमपीएससीची सर्व रिक्त पदे 31 जुलै 2021 पर्यंत भरण्याची घोषणा केली आहे.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने पुण्यातील स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्य एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून अगोदर एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहामध्ये वाचून दाखवली.

राज्य सरकार एमपीएससीबाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मला विरोधकांसह राज्यातील जनतेला सांगायचं आहे की, स्वप्निल लोणकर याने 2019 मध्ये राज्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलीय.

मुख्य परीक्षा 24 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. परीक्षेचा निकाल 28 जुलै 2020 रोजी लागला आहे. या परीक्षेत 3 हजार 671 उमेदवार पात्र ठरले आहेत. 1,200 पदांसाठी ही परीक्षा झाली होती.

या दरम्यान, एससीबीसी प्रवर्गासंदर्भातील निर्णयाला 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यामुळे सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती झाल्या नाहीत. याच दरम्यान, कोरोनाची साथ आली. यात एमपीएससी आयोगाला स्वायत्तता दिलेली असल्याने आयोगाने परीक्षा रद्द केल्या आहेत.

‘मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे. आयोगाच्या अध्यक्षांशी संपर्क केला असून स्वायत्तता दिलेली असली तरी अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा निर्णय योग्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी अध्यक्षांना सांगितलं आहे, असे अजित पवार यांनी सभागृहात बोलताना सांगितलं आहे.

‘काल झालेल्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या विषयावर सर्वांनी भूमिका मांडली. सरकारने ही बाब गांभिर्याने घेतलेली आहे.

आज सभागृहात सांगू इच्छितो की, सरकार 31 जुलै 2021 पर्यंत एमपीएससीच्या परीक्षा झालेल्या रिक्त जागा भरेल. यात कोणताही अडथळा येणार नाही,’ अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.