मुंबई: दिशा सालियन प्रकरणात केंद्रीय यंत्रणा असलेल्या सीबीआयचा अहवाल आला आहे. त्यामध्ये दिशा सालियनचा मृत्यू अपघाती असल्याचे म्हटले आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर आरोप करणारे भाजप नेते आणि महिला नेत्यांनी आता माफी मागावी, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. भाजपच्या नेत्यांनी तेव्हा तोंडाची थुंकी उडवून आदित्य ठाकरे यांच्यासारख्या तरुण नेत्याला बदनाम का केले? आता या सगळ्यांनी ताबडतोब आदित्य ठाकरे यांची माफी मागितली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. (CBI concludes Disha Salian’s death was an accident)
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाची दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी संपली आहे. या चौकशीअंती दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता. यासाठी सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र, याप्रकरणातील सर्व बाबींचा तपास केला जात होता. बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या पाच दिवस आधी दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. (Narayan Rane and Nitesh Rane put serious allegations against Aditya Thackeray) मात्र, आता सीबीआयने दिशाचा मृत्यू अपघाती असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या आरोपातील हवा मात्र निघाली आहे.
नितेश राणेंकडून आरोप
दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा (Rahul Kanal) काही संबंध आहे का, याचा तपास झाला पाहिजे. ८ जूनला दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्यावेळचं राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल. त्यासाठी तपास झाला पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा भाग होता, असेही नितेश राणे यांनी म्हटले होते.
नारायण राणेंकडूनही गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची हत्या ८ जूनला आणि सुशांतची हत्या १३ जूनला हत्या झाली. आमच्या वक्तव्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोन आला. मंत्र्याची गाडी होती असे बोलू नका. तुम्हाला पण मुले आहेत. तुम्ही असे काय करू नका. हे मी माझ्या जबाबात सांगितले मात्र हे वाक्य वगळले जबाबातून वगळण्यात आले आहे, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला होता.