मुंबई: आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. खासदार संजय राऊत आज दिनांक २९ सप्टेंबर रोजी गोव्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
संजय राऊत आज गोवा दौऱ्यावर निघाले आहेत. शिवसेना गोव्यातून निवडणूक लढवणार असल्याने तिकडे आपण चाललो असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. ‘उद्धवजींच्या सांगण्याप्रमाणे मी आता गोव्याला निघालो आहे. आम्ही तिकडे २२ जागांवर लढू. आज संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. करोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजपा फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणं गरजेचं आहे’, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
भाजपाने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करु शकते. आमचं गोव्यात प्राबल्य आहे. कोणासोबत युती किंवा आघाडी झाली तर ठीक, नाहीतर आमचं आम्ही लढू, असं देखील राऊत यावेळी म्हणाले.