TOD Marathi

सोलापूर: एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत चालल्यानं आंदोलन अजून तापू लागलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात आता भाजप देखील मैदानात उतरली आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली असून कर्मचाऱ्यांसाठी संघर्ष देखील करु असं म्हटलं आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे की, आर्यन खानच्या बचावासाठी ठाकरे सरकार जीवाचं रान करतंय, पण २८ मराठी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरसुद्धा यांच्या माणुसकीला जराही पाझर फुटत नाही. ज्या लालपरीने उभ्या महाराष्ट्राला त्याच्या सुख-दुखाच्या प्रवासात निरंतर अहोरात्र साथ दिली. आज तिच्याच चालकांवरती आपला आयुष्याचा प्रवास संपवण्याची वेळ येत असेल तर हे खूप लाजिरवाणा आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

गेल्या ६ महिन्यात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावरती पडली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडं राजकारण करणं बंद करा व त्वरीत एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.