स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 चे विद्यार्थी पुण्यात भिक मांगो आंदोलन करणार आहेत. (Bhik Mango Andolan in Pune) जवळपास साडेतीन वर्ष होऊनही 1143 होऊ घातलेले अधिकारी हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना लवकरात लवकर तात्काळ नियुक्ती मिळाली पाहिजे, नियुक्तीची तारीख कळाली पाहिजे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
पुण्यात 23 ऑगस्ट 2022 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) सेवेतील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्ती मिळाली पाहिजे, याकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2019 मधून शिफारस पात्र ठरलेल्या 1145 गट अ आणि गट ब (राजपत्रित) पदांची जाहिरात 3 एप्रिल 2019 रोजी आली होती. त्यानंतर विविध आरक्षण व कोर्टासंबंधी प्रकरणांमुळे ही प्रक्रिया लांबत गेली आणि अखेर 10 जून 2022 रोजी या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या सगळ्या प्रक्रियेसाठी तब्बल तीन वर्ष कालावधी लागला. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळत नाही आणि म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागत आहे, असेही विद्यार्थ्यांनी म्हटलेलं आहे. शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार असून महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 चे साधारण 300 उमेदवार प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करतील असं विनायक देसाई, सागर दरेकर, आकाश परदेशी यांच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.