मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis ) यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर रवी राणा यांनी ५० खोके आणि गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात (Bacchu Kadu Reaction On Ravi Rana) केलेल्या वक्तव्यावरून शब्द मागे घेतले आहेत. तसंच आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण तरीही आमदार बच्चू कडू यांचा सूर मात्र वेगळाच असल्याचे दिसून आले. या वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू हे आता आपली भूमिका कार्यर्त्यांच्या मेळाव्यातून जाहीर करणार आहेत. तसं ट्वीट त्यांनी केलं आहे.
दोन्ही आमदारांच्या दरम्यान झालेल्या वादावर आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आमदार बच्चू कडूही पडदा टाकतील अशी अपेक्षा होती. मात्र, बच्चू कडू यांनी रवी राणांवर केलेल्या टीकेवरून आपले शब्द मागे घेतले नाहीत आणि वाद मिटल्याचंही भाष्य स्पष्टपणे केलं नाही. आपण आज कार्यकर्त्यांशी चर्चा आणि उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून भूमिका जाही करू, असं बच्चू कडू म्हणाले. यामुळे बच्चू कडू आता नक्की काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण चांगल्या प्रकारे हाताळंलं. मी त्यांचे आभार मानतो. पण आपल्यासाठी आपले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. त्यांच्यासोबत संध्याकाळी ६ वाजता बैठक घेणार आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नंतर पुढील निर्णय घेणार आहे, असं बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. याशिवाय कार्यकर्त्यांचा उद्या दुपारी कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते येणार आहेत. अमरावती शहरात होत असलेल्या या मेळाव्यात आपण आपली पुढील भूमिका जाहीर करू, असं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
‘वाद रवी राणांमुळे सुरू झाला, माझ्यामुळे नाही‘
वाद व्हायला नको होता. मात्र आरोपांना सुरुवात रवी राणांनीच केली. त्यामुळेच वादाला तोंड फुटलं. मी वाद केलाच नाही. पण आरोप झाल्यानंतरही गप्प राहिलो असतो तर लोकांनी मला बदनाम केलं असतं. त्यामुळे आरोपांना प्रत्युत्तर दिल्यानं वाईट किंवा चुकीचं केलं असं मला वाटत नाही. जे काही असेल, या वादात आम्ही आयुष्य घालवणार नाही. व्यक्तीगत आरोपांमध्ये शक्ती वाया घालवण्यापेक्षा सार्वजनिक कामासाठी शक्ती लावण्याचा प्रयत्न करू, असंही कडू म्हणाले. माझ्यावर गंभीर आरोप झाले होते आणि माझ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर आरोप होऊन त्याचं आयुष्यच बरदात होत असेल तर आवाज उठवणंही महत्त्वाचं आहे. पण रवी राणांनी मागितलेली दिलगिरी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवसींनी केलेली मध्यस्थी हे कार्यकर्त्यांसमोर मांडतो. त्यावर कार्यकर्ते काय म्हणतात याचा संपूर्ण विचार करून उद्या आम्ही आमची भूमिका स्पष्ट करतो, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.
राणा आणि कडू यांच्यात नक्की वाद काय?
गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी काय केलं, हे आम्हाला माहिती आहे. बच्चू कडूंनी 50 खोके घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यावर आमदार बच्चू कडू यांनी देखील जोरदार उत्तर दिलं होतं. रवी रणांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांमध्ये प्रतिमा वाईट होते असं बच्चू कडू यांचे म्हणणं होतं. त्यानंतर एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडत गेल्या. माझ्यावर गंभीर आरोप झाले होते आणि माझ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. एखाद्या चळवळीच्या कार्यकर्त्यावर आरोप होऊन त्याचं आयुष्यच बरदात होत असेल तर आवाज उठवणंही महत्त्वाचं आहे. असंही बच्चू कडू म्हणाले.