राज ठाकरेंचं पत्र, शरद पवारांची विनंती, आणि अखेर भाजपची माघार. राज्याच्या राजकारणातील अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेत सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या आमदारकीचा मार्ग आता मोकळा झालाय. (Rutuja Latke to go in Vidhansabha) पण भाजपने निवडणुकीतून माघार घेतल्यानं आशिष शेलारांना मोठा धक्का बसला आहे. अंधेरीतून माघार घेऊन पक्षानं शेलारांची अडचण केलीय का? अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या भूमिकेने सगळे फासे उलटे पडले.
फडणवीस यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याची तयारी दाखवली. (Devendra Fadnavis told that party will think about Raj Thackeray’s letter) आणि आज भाजपच्या मुरजी पटेलांचा अर्ज मागे घेण्यात आला. मात्र भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि मुरजी पटेल हे पोटनिवडणूक लढण्यावर ठाम होते. शेलार यांच्यासाठी अंधेरी पोटनिवडणूक जिंकण हा खूप महत्वाचा टप्पा होता. (Andheri by election was important for Ashish Shelar)
शेलार हे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मुंबईत पहिलीच निवडणूक होत आहे. यापूर्वी ते मंत्रिपदासाठी उत्सुक होते. परंतु, त्यांना मंत्रिपदाऐवजी मुंबई अध्यक्षपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक जिंकून आशिष शेलार यांना मुंबईतील आपली ताकद दाखवण्याची संधी चालून आली होती. जेणेकरून भविष्यात भाजपश्रेष्ठींकडून मंत्रिपद असेल किंवा अन्य गोष्टी यासाठी आशिष शेलार यांच्या नावाचा अधिक गांभीर्याने विचार होऊ शकतो. मात्र पक्षानं मात्र शेलारांच्या या सगळ्या प्लॅनची चांगलीच बोळवण केली आहे.
अंधेरीमधूनच आशिष शेलारांचे सासरे सीताराम दळवी हे शिवसेनेच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांचे मेहुणे संदीप दळवी हे मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. त्यामुळे अंधेरी पूर्वचा मतदारसंघ भाजपकडे खेचून आणण्यासाठी आशिष शेलार यांनी पोटनिवडणुकीसाठी चांगलीच फिल्डींग लावली होती. मात्र आता ही आयती संधी शेलारांच्या हातून निसटली आहे.