TOD Marathi

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष (Congress President Election) पदासाठी निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदी कोण विराजमान होणार? याची मोठी चर्चा झाली, अजूनही होत आहे. काँग्रेस अध्यक्षपदी पुन्हा राहुल गांधीच (Rahul Gandhi) की आणखी कोण अशी चर्चा होती. त्यामध्ये अशोक गेहलोत, (Ashok Gehlot) मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे अशी नाव देखील चर्चेत होती. त्यामुळे चर्चेतली नावं ही चर्चेतच राहतात की अंतिम काही निर्णय होतो आणि कोण अध्यक्ष होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेसचे नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी मात्र ही प्रक्रिया होत असताना एक मागणी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची निवड देखील निवडणुकीच्या माध्यमातून व्हावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. विविध पदांवरील व्यक्तीच्या नेमणुका ह्या नियुक्तीच्या स्वरूपात केल्या जातात, निवडणुकीच्या स्वरूपात नाही आणि त्यामुळे पक्षाचं नुकसान होतं. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी जर निवडणूक होत आहे तर प्रदेशाध्यक्ष पदासह अन्य सर्वच महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक व्हावी, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

सोबतच या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी देखील तातडीने यामध्ये लक्ष घालावे, अशी ही मागणी त्यांनी केली आहे.