TOD Marathi

एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर शिंदे गटात इन्कमिंग जोरात सुरू आहे. यामध्ये आता माजी मंत्री आणि शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar Shivsena) यांची भर पडणार असल्याची चर्चा आहे. 31 जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanath Shinde) यांच्या दौऱ्यादरम्यान अर्जुन खोतकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मी माझ्या मतदारसंघात माझा जो काही निर्णय असेल तो जाहीर करणार असं खोतकर यांनी सांगितलं. (Abdul Sattar met Dr. Shrikant Shinde)

चार दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या होत्या, अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे (Arjun Khotkar And Raosaheb Danve) यांनी संयुक्त मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती.

अर्जुन खोतकर मराठवाड्यात शिवसेनेसाठी महत्त्वाचे नेते मानले जातात. आणि याच नेत्याने जर बंडखोरी केली तर शिवसेनेला मराठवाड्यात आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, कारण यापूर्वीच आमदार संजय शिरसाठ, आमदार संदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार हे शिंदे गटात आहेत. (Sandipan Bhumare, Sanjay Shirsat)

मी अडचणीतून जातोय, मी तणावात आहे असं देखील अर्जुन खोतकर म्हणाले होते. तणावात असण्याचं कारण त्यांनी जरी सांगितलं नाही तरी ते लपूनही राहिलेलं नाही. त्यामुळे 31 जुलैला अर्जुन खोतकर काय निर्णय घेतात? किंवा त्यांनी निर्णय घेतलेला आहे का? फक्त तो जाहीर करणं बाकी आहे का? हे 31 जुलैला कळणार आहे.