TOD Marathi

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडी गेल्या अनेक दिवसांपासून नोटीस बजावत आहेत. दरम्यान, ईडीने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख यांनी या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. परंतू आज न्यायालयाने देशमुख यांना दिलासा नाकारत समन्स रद्द करण्यास नकार दिला.

तसेच कारवाईपासून संरक्षण हवे असल्यास तो विशेष न्यायालयात जाऊ शकतो, असे हायकोर्टाने सांगितले. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना महिन्याकाठी १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा दावा सिंह यांनी पत्रात केला होता.

गेल्या काही महिन्यांपासून अज्ञातवासात असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या हालचाली पुन्हा वाढल्या आहेत. त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी ईडी, सीबीआयला कळविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांना पकडण्यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे.