टिओडी मराठी, दि. 15 मे 2021 – आंध्रप्रदेश राज्याच्या प्रतिष्ठेच्या विरोधात काम केल्याचा आरोप ठेवून सीआयडीने आंध्र प्रदेशचे खासदार कानुमारी रघुराम कृष्णम राजू यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी कानुमारी रघुराम कृष्णम राजू यांनी केली होती. त्यांना आंध्र प्रदेश सीआयडीने हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
कानुमारी रघुराम कृष्णम राजू हे आंध्र प्रदेशातील नरसपुरम लोकसभा मतदारसंघामधील खासदार असून सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसचे ते खासदार आहेत, परंतु ते बर्याच काळापासून बंडखोर वृत्तीचे अनुसरण करीत आहेत.
सीआयडीच्या अतिरिक्त महानिदेशकांच्या आदेशानुसार खासदारांविरोधात कलम -124 अ (देशद्रोह), 153 अ (समाजात दुर्भावना निर्माण करणे) 505 (तणाव निर्माण करणे) 120 ब (षड्यंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वी कानुमारी रघुराम कृष्णम राजू यांनी सीबीआय स्पेशल कोर्टाला अधिक मालमत्ता प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती.
या दरम्यान, आयपीसी अंतर्गत ज्या कलमांखाली राजूला अटक केली आहे, त्यात राज्य सरकारची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जातेय. खासदार राजू यांनी आपल्या आरोपात जगन सरकारला भ्रष्टाचार प्रकरणावरून लक्ष्य केले होते.
याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक पी.व्ही. सुनील कुमार यांच्या आदेशानुसार प्राथमिक चौकशी केली. कानुमारी रघुराम कृष्णम राजू आपल्या भाषणांद्वारे नियमितपणे समाजात तणाव निर्माण करणे आणि विविध सरकारी व्यक्तिमत्त्वांवर हल्ला करत होते.
जेणेकरुन लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होईल. तसेच ते समुदाय व सामाजिक गटांविरूद्ध द्वेषयुक्त भाषण करत होते. यासह सामाजिक दुर्भावना निर्माण आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यासाठी काही माध्यम वाहिन्यांद्वारे कट रचला जात होता, असा आरोप केला आहे.