TOD Marathi

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अमृताची लावणी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूपच आवडली आहे. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर या गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता अमृता खानविलकर हिने चाहत्यांना आणी प्रेक्षकांना आवाहन केलं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या कलेला बदनाम करू नका, असे आवाहन अमृताने केले आहे.

 

अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) म्हणाली की, ट्रोल केल्याने केवळ व्ह्यूज मिळतात म्हणून लावणीला ट्रोल करू नका. लावणी ही शृंगारिक आहे, हे खरं… मात्र, ती स्पिरिच्युअलसुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे, तिला गालबोट लावू नका, असं जाहीर आवाहन तिने केलं आहे. लावणीचा कार्यक्रम ठेवला म्हणून वैद्यनाथ गणेशोत्सवावर काही टीका झाली होती. त्याचा दाखला देत अमृता यावेळी म्हणाली की, लावणी ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. तिला अशा खालच्या नजरेतून बघणे पाप आहे.

 

नाथ प्रतिष्ठानला बदनाम करू नका : धनंजय मुंडे

धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या परळीच्या नाथ प्रतिष्ठान मागच्या सतरा वर्षापासून वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहे. याही वर्षी या गणेशोत्सवामध्ये लावणी.. कव्वाली.. भीम गीते आणि हास्य कार्यक्रमांचही आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी लावणीचा कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमावर टीकादेखील झाली होतो. यावेळी धनंजय मुंडे यांनी हात जोडून विनंती करतो पण नाथ प्रतिष्ठानला बदनाम करू नका अशी विनंती केली आहे. वैद्यनाथ गणेशोत्सवामध्ये अजय-अतुल यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने धनंजय मुंडे व्यासपीठावरून बोलत होते.